21 वे शतक हे आधुनिक वैद्यक शास्त्राचे (Modern Medicine) असून, जग सध्या 'समग्र आरोग्य' (Holistic Health) याकडे वळत आहे. आज आरोग्य हा मनुष्याचा मूलभूत हक्क आहे असे समजण्यात येऊ लागले आहे. तसेच आरोग्य प्राप्त करणे हे सामाजिक ध्येय मानले जाऊ लागले. यातूनच 'सर्वांसाठी आरोग्य' (Health for All) ही संकल्पना पुढे आली आणि सार्वजनिक आरोग्याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले. सार्वजनिक आरोग्य (Public Health) ही संकल्पना केवळ व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित नसून, ती संपूर्ण समाजाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाचा पाया आहे. 'स्वस्थ नागरिक हीच खरी राष्ट्राची संपत्ती असते'. सुदृढ आरोग्य हे आनंदी आणि कार्यक्षम जीवनासाठी आवश्यक आहे. व्यक्ती शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या निरोगी असेल तरच तो आपली कर्तव्य व जबाबदारी कार्यक्षमतेने पूर्ण करू शकतो. म्हणूनच निरोगी नागरिक राष्ट्राच्या विकासाचा कणा असतात. आरोग्यपूर्ण समाजच शिक्षण उद्योग आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती करू शकतो. देशाचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी 'सर्वांसाठी चांगले आरोग्य' असणे गरजेचे आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाचा सार्वजनिक आरोग्य एक मूलभूत घटक आहे.
Publication Date: 2026-05-09